वक्फ विधेयकाविरोधातील आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण   

कोलकाता : वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ आंदोलकांनी दगडफेक करत वाहनांची आग लावत तोडफोडही केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरमध्ये हा हिंसाचार उफाळला आहे. 
 
आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविला होता. यावेळी पोलीस रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास आले असता हिंसाचार सुरू झाला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, तसेच वाहनांना आगही लावण्यास सुरुवात केली. बहुतांश पोलिसांच्याच वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीचार्जही करावा लागला. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 
 
पश्चिम बंगाल पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसाचार भडकला आहे. यावेळी मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमाव रस्त्यावर उतरला आहे. अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि बेकायदा घुसखोरीमुळे पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे, असा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे.

Related Articles